कारगिल युद्ध घमासान सुरु होते ,
मेजर सर्वानन यांनी भीषण पराक्रम गाजवून समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईत ९ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्थान घातले होते. उंचावरच्या टेकड़ीवर बंकर मध्ये उलटे घुसून पाकिस्तानी सैनिकांच्या मशीनगननी स्वतःच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली असतानाही मेजर सर्वानन यांनी मुतालिक ठाण्यावर भारताचा तिरंगा फडकवाला आणि मगच या तरुण शुर भारतीय उच्चविद्याविभूषित सैनिक अधिकाऱ्याने प्राण सोडला.
मेजर सर्वानन यांनी भीषण पराक्रम गाजवून समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईत ९ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्थान घातले होते. उंचावरच्या टेकड़ीवर बंकर मध्ये उलटे घुसून पाकिस्तानी सैनिकांच्या मशीनगननी स्वतःच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली असतानाही मेजर सर्वानन यांनी मुतालिक ठाण्यावर भारताचा तिरंगा फडकवाला आणि मगच या तरुण शुर भारतीय उच्चविद्याविभूषित सैनिक अधिकाऱ्याने प्राण सोडला.
सकाळचे 6 वाजले होते.
पहिल्या चहासोबत टेबलावरच्या वर्तमानपत्रातली ही तेज:पुंज बातमी मी वाचली.
नंतर नैमित्तिक कामे सुरु केली.
११ च्या दरम्यान वैशाली मध्ये एका क्लाएंट सोबत मीटिंग होती.
कामाच्या गोष्टी संपल्यावर त्याला मी मेजर सर्वाननने गाजवलेला पराक्रम सहज सांगितला.
रोमांचित झालेल्या माझ्या क्लाएंटने मला एक साधा प्रश्न विचारला..........
ज्या प्रश्नाने नंतर इतिहास घडवला.
त्याने विचारलं, "कुठल्या शिखरावर हां 'न भूतो न भविष्यती' पराक्रम गाजवला सर्वाननने?"
सकाळी ६ वाजता ही रोमांच उभे करणारी बातमी वाचून जो मी, भारतीय शहीद सैनिकांच्या अलौकिक त्यागाने अंतर्बाह्य थरारून उठलो होतो, त्याच मला निव्वळ ५ तासांनीच त्या विलक्षण पराक्रमाचे साधे ठिकाणही स्मरत नव्हते.
स्वतःवरच उद्विग्न झालो.
घरी आलो.....
गार्गीला म्हटलं पेपर कुठेय आजचा ?
गार्गी म्हणाली, सकाळी सकाळी पीठ दळून आणलं होतं ते चाळायला वापरलं होतं नेमकं ते पान,
तरातरा खाली गेलो, जोशी नावाच्या मित्राच्या घरी...त्याची आई म्हणाली...मोठा मुलगा गोव्याला गेला आहे कार ने सकाळीच , तो कारची काच पुसायला पेपर घेऊन गेला आहे...
अजून त्रासलो...शेजारच्या बिल्डींग मध्ये दीक्षित काका राहतात, ते पेपर कटिंग काढून ठेवतात, त्यांच्याकडे निश्चित पेपर सापडेल म्हणून...त्यांच्याकडे गेलो लगबगीने,
दीक्षितांच्या सौंनी सकाळीच मेथी निवडून, त्याच पेपरमध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवली होती...संध्याकाळी वापरण्यासाठी...
पेपर अस्तित्वहीन झाला होता
मस्तक फिरलेल्या अवस्थेत घरी आलो...
मनात म्हटलं...आज पूर्ण देश भारतीय सैनिकांच्या अतुलनीय त्यागामुळे प्रेरित झाला आहे...चार्ज अप झाला आहे...मी ही त्यापैकीच एक आहे
पण मला सकाळी ६ वाजता वाचलेलं ११ वाजता आठवत नाही...
आज मी मेजर सर्वानन यांच्या त्यागाचे ठिकाण विसरलो...
उद्या मी मेजर सर्वानन विसरेन
....आणि परवा कारगिल विसरेन...
आज ९९ साली माझा मोठा मुलगा , ओम, सव्वा वर्षांचा आहे...
तो मोठा झाल्यावर मला विचारेल , "बाबा, १९७१ सालच्या पाकिस्तान युद्धाविषयी सांगा जरा मला"...
मी हसून म्हणेन ,"अरे, ७१ साली मी १ वर्षाचा होतो, मला काहीच आठवत नाहीये."
मग लगेच तो मला विचारेल,"बर बाबा मग मला कारगिल युद्धाविषयी सांगा जरा मला.
तेव्हा तर तुम्ही २९ वर्षांचे होतात ना ?"
आणि मला जर हे काहीच आठवत नसेल तर , कुठल्या तोंडाने त्याला मी देशावर प्रेम कर, देशासाठी मागचा पुढचा विचार न करता देशासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या सैनिकांचे स्मरण कर हे सांगणार ?
...ही लज्जास्पद परिस्थिती पुढे भविष्यात माझ्यावरच काय देशातल्या कुठल्याच बाबावर आणि आईवर येऊ नये अशी प्रबळ इच्छा तत्क्षणी माझ्या मनात निर्माण झाली.
सरळ माझ्या बॉस ला फोन केला, २ महिन्यांची सुट्टी टाकली...माझा बॉस हि चांगला होता...
ज्या कारणासाठी सुट्टी मागितली होती त्याचे गांभीर्य ध्यानात ठेवून त्याने क्षणार्धात माझी सुट्टी मान्य केली.
पुढचे तब्बल अडीच महिने रात्रंदिवस गुरासारखे कष्ट केले मी...
देशभरातल्या जवळपास ४५ विविध वर्तमानपत्रातल्या कारगिल युद्धाबाबतच्या तब्बल ३५००० लहानमोठ्या बातम्या मी गोळ्या केल्या...आवश्यक त्या बातम्या संपादित केल्या...
आणि हा तब्बल २५० पानांचा कारगिल-संदर्भ-ग्रंथ तयार केला.
अनेक मान्यवर प्रथितयश प्रकाशकांकडे गेलो...सर्वांनी सांगितलं या २५० पानी ग्रंथाची किंमत किमान २५०/- रुपये ठेवायला लागेल...तर आणि तरच आम्हाला हे प्रकाशित करणे परवडेल..
मला हे मान्य नव्हते...कारण ९९ साली २५०/- रुपये देवून सर्वांनीच हा ठेवा घेतला असता असे नव्हते....
कारण हा अनमोल ऐतिहासिक ग्रंथ घराघरात भारतीय शौर्याची गाथा म्हणून जोपासला जावा...वाचला जावा...स्मरला जावा...हा ग्रंथ वाचून तरुणांनी सैन्यात भारती व्हावे...देशासाठी आयुष्य द्यावे...ज्या शहीदांनी आपले आयुष्य देशासाठी त्यावेळी दिले त्यांचे किमान स्मरण तरी आपणांस असावे...अशी माझी हा सर्व प्रपंच करण्यामागची प्रबळ इच्छा होती...
...आणि म्हणून हा ग्रंथ मी स्वतःच प्रकाशित करण्याचे ठरवले....
एक दिवशी संध्याकाळी या पुस्तकाच्या प्रिंटआउटचे बाड घेवून अलका चौकात उभा राहिलो...
जवळपास १०० रिक्षावाल्यांना विचारलं...
हा असा संदर्भ ग्रंथ मी तयार केला आहे...याची किंमत किती असावी म्हणजे तुम्हाला हे परवडेल?..
जवळपास सर्वांनी सांगितले...हा ग्रंथ तर अनमोल आहे...पण आमच्यासारख्या साध्या गरीब रिक्षावाल्याची एका दिवसाची कमाई साधारण ५०/- रुपये असते...
त्यामुळ हा ऐतिहासिक ठेवा तुम्ही ५०/- रुपयाला द्याल तर आम्ही हा नक्की घेऊ आणि घरात जोपासून ठेवू...
...आणि आता या कारगिल ग्रंथाची किंमत ठरली...निव्वळ ५०/- रुपये....
दर्जेदार ८० जीएसेम पांढरा स्वछ कागद, उत्तम बांधणी असलेल्या या २५० पानी ग्रंथाचे ४५/- रुपये निर्मिती मूल्य होते जवळपास...
पण तरीही सर्वांनाच परवडावा म्हणून हा संदर्भ-ग्रंथ ५०/- रुपयाला लोकांना उपलब्ध करून देण्याचा ठरला....
एअर चीफ मार्शल हृषीकेश मुळगावकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राम शेवाळकर , द. मा. मिरासदार अश्या दिग्गजांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत या संदर्भग्रंथाचे विमोचन मात्र झाले कारगिल मध्ये शहीद झालेल्या पुणे जिल्हातल्या शिपाई शिंदे याच्या वीरपत्नीच्या हस्ते.
पहिलीच ५००० प्रतींची आवृत्ती तीन दिवसात संपली....एकंदर २८००० प्रती मराठीच्या संपल्या...
यथावकाश...इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि संस्कृत मध्ये सुद्धा भाषांतरे झाली या ग्रंथाची आणि देशविदेशांत लोकांनी हा ग्रंथ घरी जपला आहे....
या ग्रंथामध्ये अजून एक विलक्षण गोष्ट मी केली आहे आणि ती म्हणजे कारगिल युद्धामध्ये एकुणेक शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे नाव, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची तारीख, त्यांचा पूर्ण पत्ता, आत्ता त्यांचे कोण नातलग जिवंत आहेत त्यांचे नाव अशी एक विस्तृत यादी या ग्रंथाच्या शेवटाला मी दिली...
आणि हा ग्रंथ विकत घेणाऱ्या प्रत्येकाला मी अशी विनंती केली कि या विस्तृत यादीतला किमान एक शहीद तुम्ही निवडा आणि त्याचे नाव, गाव, पत्ता, तारीख कुठेतरी नीट नोंद करून ठेवा...
आणि दरवर्षी त्या शाहिदाच्या बलिदान दिवशी त्या शाहिदाच्या नातलगांना किमान एक चार ओळींचे पत्र नक्की पाठवा...
की...
या दिवशी अमुक वर्षांआधी तुमच्या घरातला हा शूर भारतीय देशासाठी शहीद झाला...
आज त्याचे वर्षश्राद्ध आहे...
आज या दिवशी तुमच्या सोबतच तुमच्या घरातल्या या शूर भारतीयाची तुमच्या सोबतच आम्हालाही आठवण आहे...
आणि आज त्या शाहिदाचे स्मरण करून आमचा घास ही ओठी अडकतो आहे...
त्या शाहिदाच्या आईच्या, बाबांच्या. बहिणीच्या, भावाच्या हाती जेव्हा तुमचे पत्र पडेल तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरून वाहिल्याशिवाय राहणार नाहीत...
कृतार्थतेच्या आणि कृतज्ञतेच्या अश्रूंनी.....
माझ्या आयुष्यातले जवळपास ५ महिने देवून केलेले माझ्या या सर्व कष्टांचे पूर्णतया चीज नंतर मला आलेल्या दोन पत्रांमुळे झाले.
एक पत्र आले होते...गुरखा रेजिमेंट मधून...
माझ्या या ग्रंथाची एक हिंदी प्रत त्या बटालियन च्या एका कर्नलच्या हातात पडली आणि त्या अधिकाऱ्याने त्या पुस्तकाचे पुढील एक महिना गुरखा रेजिमेंट मध्ये जाहीर वाचन केले...
आणि नंतर त्या कर्नल ने थेट सीमेवरून मला आभाराचे पत्र पाठवले...
आणि दुसरे पत्र म्हणजे...
बिहार मधल्या एका शहीद सैनिकाच्या बहिणीने, तिला माझ्या पुस्तकाच्या लिस्ट च्या आधाराने पाठवलेल्या एका पत्राचा हवाला देऊन, मला पाठवलेले पत्र...
तिचा एकुलता एक भाऊ कारगिल मध्ये शहीद झाला होता...
त्याच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी दापोली येथील एका शिक्षकांनी तिला तिच्या भावाच्या शहीदत्वाची आठवण करुन देणारे पत्र....
ते पत्र वाचले आणि पुढचा तब्बल एक तास मी ढसाढसा रडत होतो....
आज बरोबर १६ वर्षे झाली या मेजर सर्वानन यांच्या मी सकाळी ६ वाजता मी वाचलेल्या बातमीच्या घटनेला...
म्हणून हा लेखन प्रपंच...
भारत माता कि जय

No comments:
Post a Comment